मुंबई : मुंबई महाराष्ट्राची तशी भारताची आर्थिक राजधानी आहे. कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या या शहरात मराठी जनांसह इतर राज्यातील लोकांचाही मोठा भरणा आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतून मराठी माणूस बाहेर जाता कामा नये, यासाठी शिंदे-फडणवीस सरकार कायदे बदलण्यासही तयार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुंबईत वरळी इथं विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सीएम शिंदे म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्र मिळवताना १०६ जणांनी बलिदान दिलं याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळं मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पिछेहाट होणार नाही. मुंबईत मराठी ठसा आणि मराठी टक्का कायम राहावा यासाठी देखील आमच्या सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारच्या माध्यमातून मी बोलू इच्छितो की, मराठी माणूस मुंबईतून बाहेर जाता कामा नये. पण जो मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत परत आणण्यासाठी यासाठी देखील पुनर्विकासाचे प्रकल्प जे थांबलेले आहेत त्यासाठी नियम कायदे बलण्यास सरकार तयार आहे, हे मी सांगू इच्छितो
मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना घोषणाबाजी
मुंबईतील मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर मुख्यमंत्री बोलत असताना अचानक सभागृहात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील गावांवरुन घोषणाबाजी सुरु केली. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी दिल्या गेल्या. यामुळं मुख्यमंत्री क्षणभर थांबले आणि म्हणाले, यासाठी सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीला गेलो होतो. यावेळी गृहमंत्र्यांनी पहिल्यांदा या विषयावर हस्तक्षेप केला, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे.