मुख्तार अंसारीच्या गुन्हेगारी साम्राज्यावर धडक कारवाई

उत्तर प्रदेशात मुख्तार अंसारीच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सिराज अहमद नावाच्या बिल्डरवर लखनऊ विकास प्राधिकरणाने (एलडीए) मोठी कारवाई केली आहे. लखनऊ विकास प्राधिकरणाने बिल्डर सिराज अहमद यांचे एफआय हॉस्पिटल सील केले आहे. यासोबतच रुग्णालयाला लागून असलेल्या सिराज अहमद यांच्या एफआय टॉवरवरही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नऊ मजली टॉवरवर बेकायदेशीरपणे बांधलेले दोन मजले पाडण्यात येणार आहेत.
एलडीएने एफआय टॉवरला सातव्या आणि आठव्या मजल्यावरील २४ फ्लॅट्स आणि नवव्या मजल्यावर बांधलेले तीन पेंटहाऊस बेकायदेशीर घोषित करत नोटीस दिली आहे. एलडीएने मुख्तार अंसारीच्या जवळचे समजले जाणारे बिल्डर शोएब इक्बाल, मोनिस इक्बाल, सिराज अहमद आणि मायकल यांच्यावर कैसरबागमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वीच मोनिसला अटक करून तुरुंगात पाठवले आहे, तर सिराज आणि मायकलचा शोध सुरू आहे.
याआधी १७ डिसेंबर २०२२ रोजी हाजीपूर आणि हजरतगंज पोलिसांच्या उपस्थितीत लखनऊतील दोन भूखंड जप्त करण्यात आले होते. मुख्तार अन्सारीची आई राबिया खातून उर्फ राबिया बेगम आणि बहीण फहमिदा अन्सारी यांच्या नावावर हे भूखंड नोंदणीकृत आहेत. या दोन्ही भूखंडांची किंमत सुमारे आठ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात बंद आहे. त्याच्यावर गँगस्टर कायद्यांतर्गत खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, धमकावणे आदींसह अन्य ५९ गुन्हे दाखल आहेत. मुख्तार अन्सारी व्यतिरिक्त त्याच्या टोळीतील २८२ जणांवर पोलिस कारवाई सुरू आहे. यातील १२६ जणांवर गुंडा कायद्यांतर्गत, तर ६६ जणांवर गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर मुख्तार अन्सारीचे पाच साथीदार पोलिसांनी चकमकीत मारले आहेत.