जळगाव : लाडकी बहीण योजना ही बहिणींना फसवण्यासाठी आणली आहे, अशी टिका विरोधांकडून केली जात आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. तसेच विरोधक काहीही बोलतील. त्याकडे लक्ष देऊ नका, विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी लाडक्या बहिणींना केले.
शहरातील सागरपार्क मैदानावर आयोजित ‘महिला सशक्तीकरण अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. माय-माऊलींचे सबलीकरण, सक्षमीकरण, सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम आम्ही केलं, असे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी काही भगिनींना अडचणी येत असतील तर घाबरू नका. अजून फॉर्म भरता येणार आहेत. कोणी काही खोटं सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मागे लोकसभेला तसं घडलं. जाणीवपूर्वक ‘संविधान बदलणार, आरक्षण काढणार’ अशा प्रकारचा खोटा प्रचार विरोधाकांनी केला, असे अजित पवार म्हणाले.
आम्ही कधीही तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. आम्ही स्पष्ट बोलणारे आणि घेतलेला निर्णय राबवणारी लोकं. आम्ही कामाची माणसं. आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाहीये. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे, से अजित पवार म्हणाले.
कुणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की, हे दीड हजार रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो हे पैसे परत घेण्याकरता नाही तुमच्याकरता दिलेले आहे. त्याच्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी लाडक्या बहिणींना केले.
योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार आहे. त्यामुळे काही भगिनींना फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत असतील तर घाबरू नका. अजून फॉर्म भरता येणार आहेत, असेही अजित पवार म्हणाले.