मुंबई : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेतून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. या दौर्याबाबात मी आनंदी आणि समाधानी आहे. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच हे सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून ते प्रत्यक्षात उतरतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी करुन ते अमलात आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. हे करार फक्त स्वाक्षरी पुरते झालेले नाहीत. या करारांमुळे महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतील. मी जरी महाराष्ट्रात परतोल असलो तरी उद्योग मंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्राची आपली टीम दावोसमध्ये आहे. पुढील दोन दिवसांत आणखी एमओयू होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दावोसमध्ये विविध देशांचे प्रतिनिधी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दावोसच्या परिषदेवर छाप पाहायला मिळाली. दावोसमध्ये मोदींचे आकर्षण असल्याचे आम्हाला दिसले. महाराष्ट्र हे प्रो इंडस्ट्रियल स्टेट असल्याचे आम्ही सर्वांसमोर मांडले. जे उद्योग महाराष्ट्रात येतील, त्यांना रेड कार्पेट अंथरु तसेच कर सवलत आणि विशेष पॅकेज देऊ, अशी घोषणा आम्ही दावोसमध्ये केली, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हे सरकार उद्योजकांना चालना देणारे आहे. उद्योगांसाठी आम्ही सिंगल विंडो सुरु केली असल्याचेही त्यांनी सांगितले.