मुख्यमंत्री शिंदेंनी ‘तो’ प्रश्न विचारत सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का, नक्की काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर : येथे आज राज्य मंत्रिमडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठीकत राज्य सरकारकडून जवळपास ६० हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा आज करण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. दरम्यान या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी “राऊत आले नाहीत का?” असा प्रश्न विचारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत विकासकामांची माहिती देताना “राऊत नाही आले का?” असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित पत्रकारांना विचारला. यानंतर पत्रकारांना देखील हसू आवरलं नाही. यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे यांनी दुसऱ्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या राऊत नावाच्या पत्रकाराचा उल्लेख करत आपण त्यांच्याबद्दल विचारत असल्याचं म्हटलं.

दरम्यान, या बैठकीपूर्वी खासदार संजय राऊत यांनी मला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यामुळे मी देखील या पत्रकार परिषदेला जाणार असल्याचे म्हटले होते. तसेच आज देखील पुन्हा संजय राऊत यांनी ‘मी महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक आहे. माझी इच्छा झाली तर मी मुख्यमंत्र्यांच्या प्रेसला नक्की जाणार आहे. पण मी गेलो तर मला पोलीस अडवतील आणि गोंधळ होईल. मला असा गोंधळ नको आहे. असं विधान केलं होतं.

तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेसाठी खासदार संजय राऊत यांना देखील पास देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यामुळे संजय राऊत हे खरंच मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र संजय राऊत हे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी खोचक सवाल विचारला.