मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झालेल्या तब्बल १२ निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी करण्यात आल्याची बाब बुधवारी उजेडात आली. याचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, याची चौकशी सुरू आहे.
निवेदन देणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी असलेले असे डझनभर निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाले. मात्र प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांनी अशा कोणत्याही निवेदनावर स्वाक्षरी केलेली नाही.
त्यानंतर या स्वाक्षऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला संशय आला, त्यामुळे त्यांनी याची चौकशी केली असता मुख्यमंत्र्यांनी अशा कोणत्याही निवेदनावर कधीही स्वाक्षरी केलेली नाही किंवा संबंधित विषयावर कारवाई करण्याचे आदेशही दिले नसल्याचे आढळून आले.
यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील डेस्क अधिकाऱ्याने या प्रकरणाची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केली. तक्रारीच्या आधारे मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. बुधवारी रात्री 7.30 वाजता या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे कळते.
कलम ४२०, ४६५, ४७१,४७३, ४६८ आयपीसी अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. स्वाक्षरीशिवाय मुख्यमंत्री कार्यालयाचा बनावट शिक्काही वापरण्यात आला होता, त्याची चौकशी सुरू आहे.
यामध्ये कोणी आतल्या व्यक्तीचा सहभाग होता की बाहेरच्या व्यक्तीने ही फसवणूक केली आहे का, याचा शोध घेतला जात आहे. निवेदन देणाऱ्या लोकांचीही पोलिस ओळख करत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाला हे निवेदन कोणी दिले हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.