तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। गेल्या काही वर्षांपासून जास्तीचा पावसामुळे उडीद व मुगाच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने उत्पन्नात घट होत असल्याने यंदा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उडीद व मुगाची लागवड कमी झाली. त्यामुळे या दोन्ही कडधान्याला मागणी वाढली असून यंदा उडीद व मुगाला विक्रमी भाव मिळाला आहे. जळगाव बाजार समितीत हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपये जास्तीचे दर शेतकऱ्यांना मिळत आहेत. जळगाव बाजार समितीकडून दोन दिवसांपासून उडीद व मूग खरेदीला सुरुवात झाली आहे आतापर्यंत जळगाव बाजार समितीतून 500 हून अधिक मुगाची खरेदी झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात २०१९ ते २०२२ या चार वर्षात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्या सप्टेंबर महिन्यातच उडीद व मुगाची काढणी सुरू होत असते. मात्र काढणीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सलग चार वर्षांपासून उडीद मुगाचे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून नुकसान होत असल्याने यंदा उडीद व मुगाच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली. २८ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे क्षेत्र यंदा १२ ते १५ हजार हेक्टर पर्यंत खाली आले. त्यातच पाऊस न झाल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे मागणी वाढली असून व कमी आहे याचा परिणाम वाढण्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
यंदा जरी उडीद मुगाला चांगला भाव मिळाला असता तरी ऑगस्ट महिन्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता . त्यात सर्वाधिक नुकसान हे उडीद व मुग या दोन्ही पिकांना झाल्यामुळे उत्पादनात देखील घट झाली आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान काही अंशी भरून निघण्याची शक्यता आहे.