मुंबई : विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत आज संपली आहे. पण अद्याप उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी या नोटिशीला उत्तर दिलेलं नाही, त्यामुळं त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर ही कारवाई होऊ शकते.
सुत्रानुसार, विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत संपली आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांकडून विधीमंडळाच्या नोटीसला उत्तर देण्यात आलं आहे. पण ठाकरे गटाच्या एकाही आमदारांकडून या अपात्रतेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
उत्तर न दिलेल्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांना विधानसभा अध्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे समर्थक आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती विधीमंडळ सूत्रांनी दिली आहे.