देशात लवकरच सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यादृष्टीने प्रचाराचा कालावधीही सुरू झाला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, असा कडक निर्देश सर्व पक्षांना दिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष व्यस्त आहे. अशा स्थितीत प्रचाराची प्रक्रियाही जोरात सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने लहान मुलांना कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचारात सहभागी करून घेण्यास मनाई केली आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राजकीय पक्षांना कोणत्याही निवडणुकीत मुलांना सहभागी न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रॅली, घोषणाबाजी, पोस्टर्स वाटप यासह प्रचारापासून मुलांना दूर ठेवावे. याशिवाय राजकीय नेते आणि उमेदवारांना निवडणूक प्रचार किंवा रॅलीदरम्यान वाहनात लहान मूल ठेवण्याची किंवा नेण्याची परवानगी नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.