भुसावळ : दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून 29 अल्पवयीन मुलांची रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी बुधवार, 31 मे रोजी सुटका केली होती. मानवी तस्करी होत असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली असलीतरी भुसावळात पकडलेल्या मौलानाने अल्पवयीनांना सांगलीतील मदरशात नेत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, बिहारातील 19 पालकांनी रेल्वेने शुक्रवारी भुसावळ गाठत लोहमार्ग पोलिसांची भेट घेतली. यावेळी सर्व पालकांचे सविस्तर जवाब लिहून घेण्यात आले असून त्यात पालकांनी त्यांच्या मुलांना सांगलीतील मदरसा येथे शिक्षण घेण्यासाठी पाठवत असल्याचे सांगितले तर बिहारात गेलेल्या पोलीस पथकालादेखील पूर्णिया जिल्ह्यातील पालकांनी शिक्षणार्थ मुलांना मदरसा येथे पाठवत असल्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पालक म्हणाले, मुलांना शिक्षणासाठी पाठवले
बिहार राज्यातील पूर्णिया भागातील 19 पालक शुक्रवारी शहरात आल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसांची भेट घेत आपल्या मुलांना सांगतील मदरसा शिक्षणासाठी पाठवल्याची माहिती दिल्यानंतर प्रत्येक पालकाचा अधिकार्यांनी स्वतंत्र जवाब नोंदवला आहे तर बिहारात गेलेल्या पोलीस निरीक्षक विजय घेर्डे यांच्यासह अधिकार्यांनी अन्य पालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनीदेखील मुलांना शिक्षणासाठी सांगली येथे मौलानासोबत पाठवल्याची माहिती दिली. भुसावळातील 29 बालके सध्या जळगावातील बालनिरीक्षण गृहात तर मनमाडमध्ये सुटका करण्यात आलेली 30 मुले नाशिकमधील एनजीओच्या माध्यमातून नाशिक येथील बाल निरीक्षणगृहात आहेत.
मुलांच्या ताब्याबाबत जिल्हाधिकारी घेणार निर्णय
दरम्यान, मुलांना पालकांकडे ताबा देण्याबाबत जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल आता बालकल्याण समितीला काय निर्णय देतात? याकडे लक्ष लागले आहे. बालकल्याण समितीनेही मुलांशी संवाद साधत भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून कारवाईबाबत माहिती जाणून घेतली होती.