मुला-मुलींचे वेळेत लग्न केल्यास सुखी संसार, खान्देश तेली समाज मंडळाच्या प्रबोधन शिबिरात विचार मंथन

नंदुरबार – शिक्षणाबरोबर मुला-मुलींना संस्कार देणे देखील गरजेचे आहे. जेणे करून ते तुमची जाणीव ठेवून थोरामोठ्यांचा आदर करतील. आजच्या युगात मुला-मुलींचे वेळेत न जुळणारे विवाह ही बाब अतिशय चिंतेची आहे. त्यासाठी कारणे देखील तशी आहेत. मुला-मुलींना अजून भरपूर शिकायचे आहे, त्यांना करिअर घडवायचे असून स्वतःच्या पायावर उभ रहायचं, असा विचार पालकांनी करणे योग्य आहे. परंतु दुसरीकडे मुला-मुलींचे लग्न करण्याची योग्य वय निघून जात तर नाहीना याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लग्न न जमण्याचे अनेक कारणे असतील, त्यात महत्त्वाचे म्हणजे वाढत्या अपेक्षा आणि त्या होणारे व्यवहार हे प्रमुख कारण आहे. म्हणुन मुला-मुलींचे लग्न वेळेत करुन दिल्यास त्याचे जीवन सुंदर व सुखी संसार होईल, असे प्रतिपादन प्रतिभा भरत चौधरी यांनी केले.

खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने धुळे येथे समाज प्रबोधन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात समाजातील प्रत्येकाला भेडसावणार्‍या ज्वलंत असलेल्या मुला-मुलींचे वेळेत न जुळणारे विवाह, समाजातील वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण या दोन्ही समस्यांवर विचारवंतांनी विचार मांडून चर्चा केली. त्यात नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील प्रतिभा भरत चौधरी यांनी आपल्या अनोख्या शैलीतून विचार मांडतांना सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 

प्रतिभा चौधरी म्हणाल्या की, लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर आणि सुखद अनुभव आहे. दोन जिवांचे मधुरमिलन आणि सुख दुःखात केलेले पदार्पण हे वेळेत लग्न झाल्यावरच असते. आजकाल मुला-मुलींचे पालक चांगले स्थळ  पाहण्यात वयाच्या 30 ते 35 व्या वर्षी आपल्या मुला-मुलींचे लग्न करतात. आता तर मुलींच्या आई-वडीलांच्या डोक्यात मुलीला अजुन भरपुर शिकायचं असून तिला तीच करीयर करायचं आहे. तिच्या पायावर उभ रहायचे, असे वार शिरले आहे. परंतु तिच लग्नाचे योग्य वय निघून जातय याकडे तरी लक्ष दिले पाहिजे. मुलीने शिकव, स्वतःच्या पायावर उभ रहाव, परंतु त्यात लग्नाचाही विचार करावा. अनेक मुली उच्च शिक्षणानंतर लग्ना ऐवजी नोकरीच्या शोधात असतात. त्यामुळे त्यांचे लग्नाच वय निघून गेलेले असते. नोकरीनंतर मुलीला स्थळ आल्यावर त्या मुलाकडील लोकांकडून मुलींच्या आई-वडिलांकडून जणून प्रश्नांचा वर्षावच होत असतो. मुलगा एकटा आहे का, तो चांगली नोकरी करतो का, त्याचे घर आहे का, त्यांची शेती आहे का, त्यांची गाडी आहे का, मग आई-वडीलजवळ नको, अशी अनेक प्रश्न मुलींचे आई-वडील विचारतात. आपण तरी एवढ्या वयात इतकी प्रगती केली होती का, याचा तरी विचार करा. म्हणुन मुलगा निर्व्यसनी असेल, चांगली नोकरी असेल तर मग प्रश्नांचा भडीमार करण्याऐवजी लग्न का जुळवत नाहीत. लग्नानंतर ते दोघे करतील त्यांच्या प्रगतीचा विचार. आजच्या बदलत्या युगात प्रत्येकाने विचार बदलायला हवे. परिस्थिती बदलत चालली आहे, वधू-वर शोधाशोध करण्याच्या नादात मुला-मुलींचे लग्नाचे योग्य वय निघून जाते. मग अनेक मुले-मुली शेवटी आपल्या पसंतीचा व्यक्ती सोबत पळून जावून लग्न करतात. मुला-मुलींना शिकवा, परंतु शिक्षणाबरोबर त्यांना संस्कारही द्यावेत. तसेच त्यांचे लग्नाच्या योग्य वेळेत लग्न करुन दिल्यास ते नक्कीच सुखी संसार करतील, असे मत कोपर्लीच्या सौ.प्रतिभा चौधरी यांनी विचार मांडतांना व्यक्त केले. खान्देश तेली समाज मंडळाने आयोजित केलेल्या समाज प्रबोधन शिबिरात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, उपाध्यक्ष जयवंत चौधरी व महिला मंडळाने राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून समाजबांधवांनी देखील उपस्थिती दर्शवून प्रतिसाद दिला.