मुसळधार पावसाचा अंदाज, या जिल्ह्यांना अलर्ट

पुणे : मान्सून सध्या देशात सक्रिय असून, देशाच्या बहुतेक भागांत तो पोहोचला आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाच्या वतीने गुरुवारी देण्यात आली. येत्या काही दिवसांत अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, पुणे व नाशिक येथील घाटांचा समावेश आहे. कोकण, गोवा या परिसरात तीन जुलै पर्यंत तर कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात पुढील ४८ तास रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे आज मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासह आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस हजेरी लावणार आहे. यासोबतच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मान्सूनने जवळजवळ ९९ टक्के देश व्यापला आहे. मागील आठवड्यापासून मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. अंदमान, निकोबार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हिमालय, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, कच्छ, सौराष्ट्र, कोकण, गोवा तसेच राज्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होत आहे.

हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेशकुमार म्हणाले, सध्या मान्सून देशभरात सक्रिय असून, त्याची आगेकूच सुरूच आहे. कोकण, गोवा, मध्य भारत आणि ईशान्येकडील राज्यांवर दाट ढग आहेत. मध्य प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा राज्याच्या मध्य भागाकडून उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मध्य प्रदेशात १२० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडणे अपेक्षित आहे.