नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुस्लीम लीगला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हटल्यानंतर राजकारण तापले आहे. राहुल गांधींच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजपाने आता राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘जिनाचा मुस्लीम लीग पक्ष, जो धार्मिक आधारावर भारताच्या विभाजनाला जबाबदार होता, तो पक्ष राहुल यांच्या मते धर्मनिरपेक्ष आहे. वायनाडमध्ये स्वीकारार्हता कायम ठेवण्यासाठी ही त्यांची त्यांची मजबुरी आहे.’ अशा शब्दात राहुल गांधींवर भाजपाने टीकास्त्र सोडले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौर्यावर आहेत. येथे विविध कार्यक्रमाला हजेरी लाऊन ते भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता राहुल यांनी मुस्लीम लीगला हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपने राहुल गांधींना थेट प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात बोलताना भाजप नेते अमित मालवीय यांनी, देशाच्या फाळणीला जबाबदार असलेला मुस्लीम लीग पक्ष राहुल गांधींच्या मते धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. वायनाडमध्ये स्वीकारार्हता टिकवून ठेवण्यासाठी असे बोलणे, ही त्यांची मजबुरी आहे, असे म्हटले आहे.
राहुल गांधी आज वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये पोहोचले होते. त्यांनी येथे अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान राहुल गांधींना केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) सोबतच्या काँग्रेसच्या युतीसंदर्भात विचारले असता, मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात नॉन सेक्युलर असे काहीही नाही, असे राहुल म्हणाले. खरे तर, इंडियन युनियन मुस्लिम लीग केरळमधील काँग्रेस आघाडीचा एक भाग आहे.