‘मे हिट’च्या तडाख्याने जळगावकर हैराण ; ‘या’ तारखेपासून जिल्ह्यात पावसाचा इशारा

जळगाव । सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात मे हिटचा तडाखा जाणवत आहे. किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी तसेच उकाड्याने जळगावकर चांगलेच हैराण झाले. मात्र यातच जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोमवारपासून (६ मे) अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सध्या जळगाव शहरास जिल्ह्यातील तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविले जात आहे. वाढलेल्या तापमानामुळे सकाळपासून उन्हाची दाहकता जाणवत असून सायंकाळपर्यंत उन्हाच्या झळा बसत आहे. यामुळे जळगावकर अक्षरक्ष: हैराण झाला आहे.यातच जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात ६ आणि ९ मे या दिवशी विविध ठिकाणी आंशिक ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवेची कमाल गती ताशी १३ ते ३५ किमी प्रतितास राहील. दरम्यान, काल शनिवारी जळगावचा पारा ४२.३ अंशावर होता सायंकाळपर्यंत उन्हाच्या प्रचंड झळा बसत आहे.

दुपारी चार वाजेच्या सुमारास तापमान ४२.४ अंशांवर होते. आज रविवारी तापमानात काही अंशी घट येणार आहे. यानंतर सोमवारी तुरळक पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पुढील आठवड्यात सुद्धा कमाल तापमानातील चढ-उतार सुरू राहणार आहे