मोठी कारवाई ! नंदुरबारमध्ये आढळला चार लाखांचा गांजा; गुन्हा दाखल

नंदुरबार : शहरातील गोंधळी गल्लीतून पोलिसांनी चार लाख 180 रुपयांचा 19 हजार 974 किलो सुका गांजा जप्त केला. या प्रकरणी एकाविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रानुसार, शहरातील जुनी गोंधळी गल्लीत 3 रोजी रात्री 11.30 च्या सुमारास हिरेन महेंद्र पवार हा घरात बेकायदेशिररित्या सुका गांजा विक्री करत होता. याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता, घरात एक लाख पाच हजार 600 रुपयांचा पाच किलो 280 ग्रॅम सुका गांजा, एक लाख एक हजार 200 रुपये किंमतीचा पाच किलो 60 ग्रॅम सुका गांजा, 32 हजार रुपये किंमतीचा एक किलो 600 ग्रॅम सुका गांजा, 36 हजार 840 रुपये किंमतीचा एक किलो 842 ग्रॅम सुका गांजा, 43 हजार 720 रुपये किंमतीचा 2 किलो 186 ग्रॅम सुका गांजा,

17 हजार 680 रुपये किंमतीचा 884 ग्रॅम सुका गांजा, 21 हजार 440 रुपये किंमतीचा एक किलो 72 ग्रॅम सुका गांजा, 41 हजार रुपये किंमतीचा 2 किलो 50 ग्रॅम सुका गांजा, 70 रुपयांची ऍल्युमिनीयम धातुची तगारी असा एकुण 4 लाख 180 रुपयांचा 19 हजार 974 किलो ग्रॅम सुका गांजा आढळून आला.

पोलिसांनी संपूर्ण माल जप्त केला असून, हवालदार विनोद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे करीत आहेत.