मोठी बातमी! अखेर धनगर समाजाचे आंदोलन मागे, मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला

अहमदनदर : गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण अखेर मंगळवारी मागे घेण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना हे उपोषण सोडवण्यात यश आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे गेल्या २१ दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू होते. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत होती. या आंदोलकांची सरकारसोबत चर्चा पार पडली.
परंतू, त्यानंतरही त्यांनी आपले उपोषण मागे घेतले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आंदोलनकर्त्यांशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर मंगळवारी मंत्री गिरीश महाजन यांनी चौंडी येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर अखेर आंदोलनकर्त्यांची आपले उपोषण मागे घेतले आहे.
सरकार धनगर आरक्षणाविषयी सकारात्मक असून त्या दृष्टीने पुढील पावले उचलली जातील, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच समाजाने उपोषण मागे घ्यावे आणि सरकारला वेळ द्यावा. ठरलेल्या वेळेत सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.