मोठी बातमी! अजित पवार आणि शरद पवार यांची वैयक्तिक सुनावणी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांमध्ये पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरुन वाद सुरु आहे.
 
यातच आता या दोन्ही गटांकडून पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा करण्यात आला आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आम्ही सातत्याने पक्षात फूट नसल्याचे सांगत असताना, आमच्या प्रकरणाकडे निवडणूक आयोगाने वाद म्हणून पाहणे चुकीचे आहे.
यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, “ही चांगली गोष्ट आहे. आमच्या पक्षात फूट नाही, असे आम्हीदेखील म्हणतो. तसेच पक्षात काही बदल झाले आहेत. आता अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असून आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत कळवले आहे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर दावा सांगण्यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांना वैयक्तिक सुनावणीसाठी बोलावले आहे.