मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून सभांमधून एकमेकांना उत्तर देण्यात येत होते. मात्र, आता अजित पवार गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार ज्याठिकाणी सभा घेतील तिथे सभा न घेण्याचा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आला आहे.
उत्तर सभा घेण्यापेक्षा पक्ष संघटनेवर आणि तळागळातील मतदार पक्षासोबत जोडण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. तसेच पक्षातील आमदारांची खात्यांसंदर्भातील कामे तत्काळ करून देण्याबाबत मंत्र्यांना आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, खरा राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी ९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.