मोठी बातमी! आता कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा पाच लाखापर्यंतचा इलाज होणार मोफत

मुंबई : प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत करणार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भंडारा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महायुतीचे तिन्ही नेते एकत्र होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी कित्येक योजनांचा पाढा वाचुन दाखवला. तर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सगळ्या अटी काढून टाकल्या असुन आता रेशन कार्डाची अट नाही. उत्पन्नाची अट नाही. असं फडणवीसांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आत्तापर्यंत आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये दोन लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे आणि तो सातत्याने रोज वाढतो आहे. त्यामुळे जे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत विविध योजना पोहचवणं त्यांना अधिक सक्षम करणं हा प्रयत्न सातत्याने आपला चाललाय. खरं म्हणजे आपला भंडारा जिल्हा हा एकीकडे निसर्ग अतिशय वैविध्यपूर्ण असा जिल्हा केलाय. हा तलावांचा जिल्हा आहे. हा जंगलांचा, वनांचा जिल्हा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेले लोकं या जिल्ह्यामध्ये आपल्याला शेतकरी पाहायला मिळतात. आणि हा धनाचा जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात याठिकाणी धानाची शेती केली जाते. मला कल्पना आहे की यावेळी काही भागामध्ये त्याठिकाणी प्रादुर्भाव झालाय. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्या ठिकाणी आमचं धान नष्ट झालं असेल त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आवश्यक ती सगळी मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातनं निश्चितपणे याठिकाणी केली जाईल. हा विश्वास मी आपलं देऊ इच्छितो हे सरकार शेतकऱ्यांना समर्पित सरकार आहे.”
“प्रधानमंत्री मोदींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये त्याठिकाणी देण्याची सुरूवात त्यांनी केली. तर राज्यात आपलं सरकार आल्यानंतर आपण नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आणि या अंतर्गत मोदीजींच्या सहा हजार रुपयांसोबत आपलं सरकारही सहा हजार रुपये आता त्याठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देत आहे. त्यामुळे बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपण सुरू केलं आहे. अजितदादांनी सांगितलं आम्ही अभिनव उपक्रम सुरू केला. एक रुपयामध्ये पीक विमा एक कोटी साठ लाख शेतकर्यांनी पीक विमा घेतला.”
“पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना तर अग्रीम फायदा त्याचा झालाय आणि जे जे शेतकरी अडचणीत आहेत त्या शेतकऱ्यांना या माध्यमातनं विम्याचा फायदा हा मिळवून देण्याचं काम आपण करतोय. कोणाचाही धान घरी राहणार नाही. सगळा धान खरेदी झाला पाहिजे. हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तात्काळ उरलेले धान खरेदी केंद्र देखील याठिकाणी सुरू झाले पाहिजेत. आमच्या शेतकर्यांचा दिवस गोड करावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतोय.” असं फडणवीस म्हणाले.