नवी दिल्ली : राज्यात एकीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांसंदर्भात अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी चालू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याची टीका शरद पवार गटाकडून केली जात आहे. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनयाचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याची सुनावणी आता १३ ऑक्टोबर रोजी अर्थात शुक्रवारी होणार आहे.
दोन्ही याचिकांवर एकत्र सुनावणी घेणार असल्याने विधानसभा अध्यक्षांना एकच निर्देश देण्यात येण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि ९ मंत्री अशी पहिली याचिका होती, त्यानंतर अन्य आमदारांवरही कारवाईची याचिका आली आहे. त्यातच शिवसेनेची देखील याचिका प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरणे एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवार गटाने आपल्या याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी केली होती. परंतू, दोन्ही याचिका एकत्र घेतल्याने दोन्ही प्रकरणांवरील निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे.