मोठी बातमी! आमदार अपात्रतेवर उद्याच सुनावणी, कारण आहे काय?

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिकांची चर्चा चालू आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही ५ महिन्यांचा काळ उलटून गेला आहे.

गेल्या महिन्यात अध्यक्षांकडून सुनावणी घेण्यासाठी वेळकाढूपणा केला जात असल्याची तक्रार करत विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर न्यायालयाने अध्यक्षांना याबद्दल फटकारलं. त्यानंतर सुनावणीचं वेळापत्रक अध्यक्षांनी जाहीर केलं. आता १३ ऑक्टोबरला असणारी नियोजित सुनावणी अध्यक्ष एक दिवस आधीच घेत आहेत. मला या विषायात कोणताही दिरंगाई करायची नाही. लवकर निर्णय घ्यायचा आहे. वेळ घालवायचा नाहीये. म्हणून उद्याच सुनावणी करणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

आमदार सुनावणीबाबत दिरंगाई केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला दिरंगाई करायची असती, वेळ काढायचा असता तर मी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं कारण सांगून सुनावणी पुढे ढकलली असती. पण मी सुनावणी आधीच घेतली.

त्यामुळे मला वेळ काढायचाय की सुनावणी लवकर संपवायचीय हे तुम्हीच पाहा. माझ्यावर जी टीका होत आहे, आरोप केले जात आहेत. त्याचा हेतू काय हे मला माहीत आहे. पण अशा टीकेने माझ्या निर्णय प्रक्रियेवर फरक पडणार नाही. जे लोक टीक करत आहेत. त्यांना निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडायचा असेल त्यामुळे ते असं करत असावेत. तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो अशा टीकेतून माझ्यावर कोणताही दबाव पडणार नाही. पडू देणार नाही. नियमानुसारच मी निर्णय घेईल, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.