मुंबई : राज्याच्या राजकारणात काल रविवार मोठी घडामोड घडली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले असून महाविकास आघाडीची पुढची दिशा काय असेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
राष्ट्रवादीतील फूट पाहून शिवसेना ठाकरे गटातील आमदारांची उद्या मुंबईत बैठक होणार असून महाविकास आघाडी आणि पुढील वाटचालीचा निर्णय घेण्यात येणार आहे. तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडून येणाऱ्या निवडणुकात स्वबळावर लढेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांंनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर “उद्धव ठाकरे यांनी आता ‘सत्तांतर करो’, ‘एकला चलो’चा नारा देऊन लोकांमध्ये जायला पाहिजे अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे.” असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मोठं बंड घडलं. ते आपल्यासोबत ४० आमदार घेऊन भाजपकडे गेले आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकाच वर्षामध्ये राष्ट्रवादीतही फूट पडल्याने मोठा राजकीय भूकंप झाला असून यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही बिघाड होतोय का याकडे लक्ष असणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना तात्पुरते विरोधीपक्षनेते पद देण्यात आले आहे पण विरोधीपक्षांपैकी काँग्रेस पक्षाकडे संख्याबळ असल्यामुळे विरोधीपक्षनेते पद कुणाकडे जाईल याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.