मुंबई : राज्यात भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांच्या युतीचे सरकार आहे. आगामी निवडणुकांना देखील भाजप-शिवसेना युती एकत्रित सामोरे जाईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रविवारी रात्री झालेल्या अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत पुढील वाटचाल कशी राहील? हे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत आहोत. रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार. राज्यात आगामी सर्व निवडणूका शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आल्याचे शिंदे यांनी ट्विट केले आहे.
असे आहे मुख्यमंत्र्यांचे ट्विट
कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.
राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार.