नागपूर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत भाषण करण्यावरुन वाद निर्माण झाला. तसेच याठिकाणी खुर्च्यांची फेकाफेक देखील करण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोरच हा वाद निर्माण झाल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
नागपूर शहर काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावतीने गुरुवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये नागपूर विभागतल्या सहा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार होता. पण भाषण करण्यावरुन दोन नेत्यांमध्ये वाद झाला आणि गोंधळ निर्माण झाला. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे बैठकीस्थळी आले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना राहूल गांधींबाबत वक्तव्य केल्यानंतर तुम्ही कोणत्या नाकाने या बैठकीला आलात, असा प्रश्न विचारला. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांची बाजू मांडण्याकरिता कार्यकर्ते नरु जिचकार पुढे आले. परंतु. त्यावेळी नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे भाषण सुरु होते.
त्यामुळे माईक घेण्यावरुन त्या दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. तसेच याठिकाणी खुर्च्यांची फेकाफेक देखील करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. पक्षाच्या जेष्ठ नेत्यांसमोर हा वाद निर्माण झाल्यामुळे पक्षाची चांगलीच नाचक्की झाली आहे. विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच राहूल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. यावरुनच हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.