मोठी बातमी ! केंद्र सरकारकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द

नवी दिल्ली । भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. या निवडीनंतर बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

बजरंग पुनिया यांनी त्यांचा पद्मश्री पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ठेवला होता आणि पत्रही लिहिले होते. यानंतर सरकारकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. कुस्तीगीरांची मागणी लक्षात घेऊन सरकारने आता नव्या कुस्ती संघटनेला निलंबित केले आहे.

कुस्ती संघटना रद्द करतानाच क्रीडा मंत्रालयाने संजय सिंगने घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही दिली आहे. क्रीडा मंत्रालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या क्रियाकलापांवर बंदी घातली आहे. डब्ल्यूएफआयबाबत दिलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, जणू काही जुने अधिकारीच सर्व निर्णय घेत आहेत.

क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईबाबत बजरंग पुनिया म्हणाला की, मला अद्याप याबाबत माहिती नाही. जर हा निर्णय घेतला असेल तर तो अगदी योग्य आहे. जे आपल्या बहिणी आणि मुलींच्या बाबतीत घडत आहे. अशा लोकांना सर्व महासंघातून काढून टाकले पाहिजे.