मोठी बातमी! चीनच्‍या लष्‍कराने तैवानच्‍या दिशेने पाठवली १०३ लढाऊ विमाने; काय घडलं?

मागील २४ तासांच्‍या कालावधीत चीनच्‍या लष्‍कराने तैवानच्‍या दिशेने एकूण १०३ लढाऊ विमाने पाठवली आहेत. एक दिवसात तैनातच्‍या दिशेने एवढ्या मोठ्या प्रमाणात विमाने उड्डाण करण्‍याची ही पहिलीच वेळ आहे, असे तैवानच्‍या संरक्षण मंत्रालयाने म्‍हटले आहे.

तैवान हे चीनच्‍या अग्‍नेय समुद्र किनार्‍याजवळ असणारे बेट आहे. तैवान स्वत:ला एक स्वतंत्र राष्ट्र मानतो. त्यांची स्वत:ची घटना आहे आणि त्यांनीच निवडून दिलेल्या नेत्यांचं सरकार आहे. तैवान हा आमचाच प्रांत आहे. एक दिवशी तो चीनचा भाग होणार आहे, असा दावा चीन करत आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने टिव्टच्‍या माध्‍यमातून खुलासा केला आहे की, चीनच्‍या ४० लढाऊ विमानांनी मुख्य भूप्रदेश चीन आणि बेट यांच्यातील प्रतिकात्मक बिंदू ओलांडला आहे. तर मागील २४ तासांमध्‍ये ९ नौदल जहाजांची सीमेजवळ नोंद झाला आहे.

तैवानच्‍या मंत्रालयाने चीनच्या लष्करी कृतींना “छळ” असे संबोधले आहे. तसेच सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचाही इशारा दिला. बीजिंग अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि अशा विघटनकारी लष्करी कारवाया तत्‍काळ थांबवाव्‍यात, असे आवाहन केले आहे.