मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे नवनियुक्ती कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच काही दिवसांपूर्वी या दोन्ही नव्या कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीत आता महाराष्ट्रातही मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये देखील चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया दोन महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी बदल अपेक्षित असल्याची देखील चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.