मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी ठाकरे पितापुत्रांनी भेट घेतली.
आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. या कामकाजात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे हे आज विधानभवनात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या दालनात ही भेट पार पडली. या बैठकीला ठाकरे गटातील काही आमदारही उपस्थित असल्याचे समजते.
मात्र, बैठकीतील चर्चेचा नेमका तपशील समजू शकलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार, ठाकरे गटाकडून ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे पितापुत्र अचानक अजित पवार यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान ही भेट झाल्यानंतर काही वेळातच या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल खुद्द उद्धव ठाकरेंनी खुलासा केला आहे. काल आणि परवा बंगळुरु येथे देशप्रेमी पक्षांची बैठक पार पडली. जी लोकशाही प्रेमी पक्षांची आघाडी स्थापन झाली आहे.
ही लढाई व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून हुकूमशाही विरोधात आहे. पण जो पायंडा पडतो आहे ते देशासाठी घातक आहे, त्यासाठी सर्व लोकशाहीप्रेमी पक्ष एकत्र येत आघाडी मजबूत निर्माण झाली आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.