Maharashtrapolitics : राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा आज (ता. १०) सुटण्याची चिन्हे आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर आज (बुधवारी ता. १०) सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता ‘शिवसेना कोणाची’ आणि ‘ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे?’ याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणार आहेत. मात्र, या कायदेशीर लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे ठाकरेंचे दोन शिलेदार निकालाच्या दिवशी अनुपस्थिती राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल देसाई कोल्हापुरात तर अनिल परब मुंबईबाहेर आहेत. आमदार अनिल परब आणि आमदार अनिल देसाई निकाल वाचनाच्या वेळी विधानभवनात उपस्थित नसणार आहेत. सुप्रीम कोर्टातली कायदेशीर लढाई, निवडणूक आयोगातील लढाई आणि विधान भवनातील अध्यक्षांच्या समोरील सुनावणी या सगळ्या लढाईत दोन्ही नेत्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली होती. आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वेळी ठाकरे गटाकडून वकील उपस्थित राहणार आहेत.