उबाठा गटाने नवी कार्यकारिणी जाहीर केली. यावर भाजप आमदार नितेश राणेंनी त्यांच्याकडे असलेली शिवसेनेची मूळ घटना दाखवली. या घटनेत कार्यकारिणी कशी आणि कोणी जाहीर करावी, याबद्दल नियम आणि कायदे आहेत. यातील नियम पाहता उबाठासारखी घरात, मातोश्रीत बसून कागदामध्ये छापलेली कार्यकारिणी ही नियमबाह्य आहे. अशा प्रकारच्या कार्यकारिणीला शिवसेनेच्या मूळ संविधानानुसार काही स्थान नाही. आम्हाला नियमबाह्य आणि घटनाबाह्य बोलणारे स्वतः एक नियमबाह्य संघटना चालवत आहेत, उरलेला पक्ष चालवत आहेत. कुत्र्याची शेपूट जशी कधीच सरळ होत नाही तसा उद्धव ठाकरेंचा कारभार आहे. अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी ठाकरेंवर केली आहे.
उबाठाच्या कार्यकारिणीवर टीका करताना नितेश राणे म्हणाले, “काँग्रेस आणि शरद पवारांप्रमाणे यांचे विचार चालवणारे काही कंत्राटी कामगार नेमलेले आहेत. संजय राऊतसारख्या काही लोकांना कंत्राट देण्यात आलं आहे. ज्या लोकांच्या नावाने पाच कार्यकर्ते जमू शकत नाहीत, अशा लोकांना सचिव आणि उपनेते बनवलेलं आहे. त्यांचं बाळासाहेबांच्या विचारांशी काही देणंघेणं नाही. उबाठाची ही नेमणूक प्रायव्हेट कंपनीसारखी आहे. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज झाला. त्या टीझरमध्ये बाळासाहेबांचा आवाज आहे का? म्हणजे ती बाळासाहेबांची सेना नाही. मी एकनाथ शिंदे साहेबांच्या मेळाव्याचा टीझर पाहिला, त्याच्यामध्ये थेट बाळासाहेब दिसतात. म्हणजे उबाठाचं बाळासाहेबांशी काही देणंघेणं नाही, हे स्वतः उद्धव ठाकरे म्हणत आहेत. निष्ठावान शिवसैनिक कार्यकारिणीच्या बाहेर आणि मातोश्रीचे निष्ठावान, यांच्या चपला आणि भांडी धुणारे कार्यकारिणीच्या आत, ही यांची निष्ठा.” अशी टीका नितेश राणे यांनी ठाकरेंवर केली.
देवाच्या नावाखाली लूट सुरु आहे. या नाना पटोलेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “भाजप राष्ट्रभक्त म्हणून देवीदेवतांचं जेवढं संरक्षण करतं तेवढं काँग्रेसला दहा वर्षात किंवा दहा पिढ्यांमध्ये देखील जमणार नाही. ते केवळ जिहाद्यांचं समर्थन, त्यांना मदत करतात. म्हणून हिंदूद्वेष्टी लोकांनी कधीही भाजपवर अशी टीका करु नये.” असं नितेश राणे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंबंधी प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले, “मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही, उलट राणे समितीनेच मराठा आरक्षण दिलं होतं. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणार्या कुठल्याच नेत्याला आजपर्यंत जे जमलं नाही ते आरक्षण राणे साहेबांनी मिळवून दिलं. ज्याला जसं जात प्रमाण घ्यायचं आहे, ते तुम्ही घ्या असं राणे साहेब म्हणाले. सर्वांनाच मराठा आरक्षण हवं आहे. पण केवळ मराठे आपापसात कसे भांडले पाहिजेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.”असं नितेश राणे म्हणाले.