मोठी बातमी! नेपाळमध्ये लँडिंगच्या आधी विमान कोसळले, आतापर्यंत 45 मृतदेह बाहेर काढले

काठमांडू : पोखराजवळ यति एअरलाइन्सचे एटीआर-७२ विमान कोसळले आहे. काठमांडूहून पोखराकडे उड्डाण करणारे यति एअरलाइन्सचे एटीआर-७२ विमान आज रविवारी सकाळी ११ वाजता कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळले. आतापर्यंत एकूण 45 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुख्य जिल्हा अधिकारी टेक बहादूर केसी यांनी स्थानिक माध्यमांना ही माहिती दिली आहे. पोखरा येथे क्रॅश झालेल्या यति एअरलाइन्सच्या विमानातील 5 भारतीयांसह सर्व 72 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणीही वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.

यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी मीडियाला सांगितले की, जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. या विमान अपघाताबाबत अजून माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. प्राथमिक वृत्तानुसार, विमानाने काठमांडूहून पोखरा येथे ६८ प्रवाशांसह उड्डाण केले होते. विमान सुमारे 20 मिनिटांनंतर क्रॅश झाले, जे त्याच्या गंतव्यस्थानापासून काही किलोमीटर दूर होते. बचावकार्य सुरू आहे.

पंतप्रधान ‘प्रचंड’ यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली
यती एअरलाइन्सच्या विमान अपघातानंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी आपत्कालीन मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. अपघाताबद्दल शोक व्यक्त करत प्रचंड यांनी गृह मंत्रालय, सुरक्षा कर्मचारी, नेपाळ सरकारच्या सर्व यंत्रणांना प्रभावी बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. अपघाताची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान प्रचंड त्रिभुवन विमानतळावर पोहोचले आहेत.

अपघातग्रस्त विमानात ५ भारतीय होते
तथापि, आता याची पुष्टी झाली आहे की यती एअरलाइन्सच्या क्रॅश झालेल्या विमानातील 68 प्रवाशांपैकी 10 प्रवासी परदेशी नागरिक होते. ज्यामध्ये ५ भारतीयही होते. यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी स्थानिक मीडियाला सांगितले की, विमानात दोन अर्भकांसह 10 परदेशी नागरिक होते. विमानात 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, एक आयरिश, 2 कोरियन, 1 अर्जेंटिनी आणि एक फ्रेंच नागरिक होते. भारताचे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नेपाळमधील दुःखद विमान अपघातातील लोकांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याचे वर्णन केले आहे. सिंधिया म्हणाले की, माझ्या संवेदना आणि प्रार्थना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत. यती एअरलाइन्सचे हे विमान मध्य नेपाळमधील पोखराच्या जुन्या आणि नवीन विमानतळादरम्यान कोसळल्याचे सांगण्यात आले. अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषाला आग लागली असून बचाव कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले. सर्व बचाव यंत्रणा आग विझवणे आणि प्रवाशांना वाचवणे यावर भर देत आहेत.

हा अपघात हवामानामुळे नाही तर तांत्रिक बिघाडामुळे झाला
नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाने दावा केला आहे की यती एअरलाइन्सचे विमान हवामानामुळे नव्हे तर तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. पायलटने एटीसीकडून लँडिंगची परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले. पोखरा ATC मधून उतरण्यासाठी ओके सुद्धा सांगण्यात आले. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे म्हणणे आहे की लँडिंगच्या काही वेळापूर्वी विमानात ज्वाळा दिसत होत्या. त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही.