दोहा : कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कतारच्या अपील न्यायालयाने हा निर्णय दिला, ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने ३० ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचे आरोप करण्यात आले होते.
कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल, नाविक रागेश आणि कमांडर सुगनाकर पकाला ही कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशी ठोठावण्यात आलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची नावे आहेत.
हे सर्वजण कतारमधील दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी या खासगी कंपनीत काम करत होते. ही कंपनी कतारच्या लष्कराला संरक्षण सेवा पुरवते. या कंपनीमध्ये हे माजी अधिकारी काम करत होते. हेरगिरीच्या आरोपानंतर ही कंपनी बंद करण्यात आली आहे.