मोठी बातमी! भारत-इटली यांच्यात लवकरच… काय होणार?

मुंबई : भारत आणि इटली हे दोन्ही देश आपले लष्करी संबंध वाढविण्यासाठी लवकरच संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करणार आहेत, अशी माहिती इटलीचे भारतातील राजदूत व्हिन्सेंझो डी लुका यांनी दिली आहे.

इटली ‘मेक इन इंडिया’मध्ये योगदान देण्यासाठी कठोर परिश्रम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील नौदल ते नौदलातील सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने इटालियन नौदलाची युद्धनौका आयटीएस मोरोसिनी 10 ते 13 ऑगस्ट या कालावधीत मुंबई बंदर भेटीवर आहेत. या काळात इटालियन नौदलाचे अधिकारी मुंबई मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेणार आहेत.

आत्मनिर्भरता, ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमात योगदान देण्यासाठी मेहनत घेत असल्याचेही लुका यांनी सांगितले. टॉर्पेडो, हेलिकॉप्टर, रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध व शिपयार्ड यांसारख्या विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे इटली ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात मोलाची भर घालू शकते, असे ते म्हणाले. ‘मेक इन इंडिया’ हा नरेंद्र मोदी सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे, जो गुंतवणुकीला सुलभ करणे, नवकल्पना वाढवणे, कौशल्य विकास वाढवणे आणि सर्वोत्तम दर्जाच्या उत्पादन पायाभूत सुविधांची उभारणी करतो.

दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातील सामंजस्य करार आधीच अस्तित्वात आहे, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही देशांनी धोरणात्मक भागीदारीमध्ये आपले संबंध वाढवल्यानंतर त्याचे नूतनीकरण केले जाईल, जे औद्योगिक सहकार्याला पुढे जाईल, असेही ते म्हणाले. मुंबईत असलेल्या आयटीएस मोरोसिनीने यापूर्वी सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, जपान, दक्षिण कोरिया व बांगलादेशला भेट दिली होती. भारतानंतर ते ओमानला जाणार आहेत.