नवी दिल्ली : भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. भारताने कठोर भूमिका घेत कॅनडाला आपल्या ४१ राजनयिकांना परत बोलावण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने कॅनडाला १० ऑक्टोबरपर्यंत ४१ राजनयिकांना परत बोलावण्यास सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा आरोप करणारे वक्तव्य केले होते. भारताने हे आरोप फेटाळले आहेत. तेव्हापासून भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये कॅनडाचे ६२ राजनयिक आहेत. तर कॅनडामध्ये असलेल्या भारतीय राजनयिकांची संख्या कमी आहे. त्यामुळेच भारताने कॅनडाला आपल्या राजनयिकांची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर भारत आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.