नवी दिल्ली : IRS अधिकारी सचिन सावंत यांच्याकडे अंमलबजावणी संचालनालयाला (ED) मोठं घबाड सापडलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सेवेत असलेले वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना बुधवारी सकाळी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली होती.
सावंत यांच्या बँक खात्यात तब्ब्ल १.२५ कोटी रुपये सापडले असल्याची माहिती आहे. सावंत यांचे नातेवाईक, वडील आणि भाऊ संचालक असलेल्या नामधारी कंपन्यांच्या नावाने ही बँक खाती आहेत. याच नामधारी/बनावट कंपन्यांच्या नावे मालमत्ता विकत घेतल्याचं ईडीच्या तपासातून उघड झालं आहे. कर्ज काढून मालमत्ता घेतल्याचं दाखवण्यात आलं असलं तरी कर्जाची परतफेड कॅशच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच सावंत यांचा राहता फ्लॅट देखील नामधारी कंपनीच्या नावाने असल्याचे ईडी तपासात आढळून आलं आहे.
मुंबईतील अपार्टमेंटमधून मिळाले कागपत्र
आयआरएस अधिकारी सचिन सावंत सध्या लखनऊमध्ये सेवेत होते. ते कस्टम्स आणि जीएसटीसाठी काम करत होते. सावंत बराच काळापासून ईडीच्या रडारवर होते. त्यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या. मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक अचानक त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी आले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत टीमला त्याच्या अपार्टमेंटमधून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि बँकेशी संबंधित तपशील मिळाले.
ईडीचेही अधिकारी होते सचिन सावंत
सचिन सावंत 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. त्यांच्याबाबात सर्वात विशेष बाब म्हणजे त्यांनी अंमलबजावणी संचालनालयातदेखील काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते चार वर्षांपासून मुंबई ईडी कार्यलयात सेवेत होते. सावंत यांची ईडीमध्ये नियुक्ती असताना मुंबईतील एका डायमंड कंपनीने 500 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी सचिन सावंतही सीबीआयच्या रडारवर आले होते. तपासादरम्यान मनी लाँड्रिंग आढळल्यानंतर या प्रकरणात ईडीची एंट्री झाली आणि आता तपास यंत्रणेने स्वतःच्याच एका माजी अधिकाऱ्याला अटक केली आहे.