मोठी बातमी ! महिला दिनानिमित्त गिफ्ट, LPG सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त

महागाईपासून काहीसा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. सरकारने 14 किलो एलपीजीची किंमत 100 रुपयांनी कमी केली आहे. X वर माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले की, ‘महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन सुसह्य होईल आणि करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल.

विनाअनुदानित 14 किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 903 रुपये आणि कोलकातामध्ये 929 रुपये आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर आता सिलिंडरची किंमत दिल्लीत ८०३ रुपये आणि कोलकात्यात ८२९ रुपये होणार आहे. सिलेंडर मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना मिळणार आहे. 1 मार्च 2023 रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1,103 रुपये होती, जी एकाच वेळी 200 रुपयांनी स्वस्त करण्यात आली.

मोदी सरकारच्या कपातीच्या घोषणेनंतर दिल्लीतील सर्वसामान्य ग्राहक 803 रुपयांना सिलिंडर खरेदी करू शकणार आहेत. तर उज्ज्वला लाभार्थ्यांना ते ५०३ रुपयांना मिळेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत, एलपीजी सिलिंडरवर सबसिडी 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असेल. अशाप्रकारे, पुढील एका वर्षात, योजनेंतर्गत समाविष्ट कुटुंबांना प्रति सिलिंडर 300 रुपये अनुदानासह 12 एलपीजी सिलिंडर मिळतील. एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशात एकूण 31 कोटी 40 लाख एलपीजी कनेक्शन आहेत. त्यापैकी 10 कोटीहून अधिक लाभार्थी उज्ज्वला योजनेचे आहेत.

केंद्र सरकारने देशातील 10 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना अनुदानित LPG सिलिंडर पुरवण्यासाठी PM उज्ज्वला योजनेचा कालावधी आणखी एक वर्ष वाढवला आहे. ही योजना 2016 मध्ये लागू करण्यात आली होती. त्याची सबसिडी कालावधी मार्च 2024 मध्ये संपत होती. आता ही सबसिडी योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.