Former MLA Santosh Chaudhary : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. अशातच जळगाव जिल्हयातील स्थानिक राजकारणात एक मोठा टर्न येण्याची शक्यता आहे. माजी आमदार संतोष चौधरी हे आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आहे. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बऱ्याच राजकीय उलथापालथी घडतील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. अगदी युती व आघाडीतही बिघाडी होऊ शकते. याचे उदाहरण म्हणजे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी. चौधरी हे शरद पवार गटातील आहे. मात्र, आता ते आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आहे. गेल्या आठ दिवसांपासून ते मुंबईत तळ ठोकून असून, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांनी दोन वेळा या संदर्भात चर्चा केली आहे.
अगदी पक्ष फुटला तरी त्यांनी पवार गटातच राहणे पसंत केले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा होती. पक्ष नेतृत्वाची चर्चा देखील झाली. कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करीत पुरेपूर वातावरण निर्मिती केली. मात्र, पक्षाने श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली.
त्यामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांचे बंड क्षमले व त्यांनी श्रीराम पाटील यांचा प्रचार केला. निवडणुकीनंतर चौधरी राजकीय चर्चेपासून दूर होते. आठ दिवसांपासून ते मुंबईत आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वरळी येथील निवासस्थानी भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. आज सकाळी कॉंग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथील कार्यालयात भेट घेऊन विस्तृत चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान, मी कोणत्या पक्षात जाणार यावर अद्याप अंतिम निर्णय घेतला नाही. विविध पक्षांशी चर्चा सुरू आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) हे निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार संतोष चौधरी यांनी सूत्रांना दिली.