मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे अचानक दिल्लीला रवाना, वाचा आतली कथा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये पोहोचले असून ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेच्या खासदारांना संधी मिळण्याबाबत ते आज चर्चा करण्याची शक्यता आहे.

शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार हा बराच रखडला आहे. या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे शिंदे गटाच्या गोटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता जाणवतेय. अपक्ष आमदारांसह अनेक आमदारांनी यासंदर्भात वक्तव्य देखील केलेली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार? या संदर्भातील चर्चा सध्या सुरू असून प्रश्नचिन्ह कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. संभावित शिंदे गटाकडून कोण मंत्री होऊ शकतात? कोणत्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल? अशा स्वरुपातील चर्चा या भेटीदरम्यान होऊ शकते आणि त्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत.

दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची काल रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक बदल आणि केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात, अशी माहिती बैठकीनंतर बाहेर आली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारचा विस्तार होणार आहे आणि त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचल्याची माहिती मिळत आहे.