मोठी बातमी! राज्य सरकारकडून अखेर ‘तो’ निर्णय मागे

एका आठवड्यापूर्वी राज्य सरकारनं महाराष्ट्रातील ऊस बाहेरच्या राज्यात जाऊ न देण्याचा आदेश काढला होता. या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे आम्ही ऊस नेणार, तुमच्यात हिंमत असेल तर आडवा असं आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी दिली होतं. दरम्यान, वाढता विरोध पाहता सरकारनं राज्याबाहेर ऊस पाठवण्यावर घातलेली बंदी उठवली  आहे.

राज्यातील ऊस परराज्यात घालवण्यावर घातलेली बंदी आता राज्य सरकारने उठवली आहे. सहकार मंत्री आणि शेतकरी संघटनांमध्ये पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या मोसमात राज्यातील ऊसाची तोळामासाची परिस्थिती पाहता राज्यातील साखर कारखानदारांकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र या निर्णयाला शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला होता.

या निर्णयाने शेतकऱ्यां सुद्धा कोंडी होणार होती. त्यामुळे या निर्णयावरून सरकार आणि शेतकरी संघटना आमनेसामने आल्या होत्या. राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन उभारलं जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता.