दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. दहशतवाद्यांच्या जैश ए मोहम्मद नावाच्या संघटनेने मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. दहशतवाद्यांनी ऑडिओ क्लिप पाठवून मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून ऑडिओ क्लिपची तपासणी सुरू आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येचे एसएसपी राजकरण नय्यर यांनी स्वतः मंदिर आणि अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यासोबतच त्यांनी मॅन्युअल आणि इलेक्ट्रॉनिक निगराणी आणखी मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी एसएसपी राजकरण नय्यर यांनी दहशतवादी संघटनेच्या धोक्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही, मात्र अयोध्येतील श्री राम मंदिराची सुरक्षा आधीच कडेकोट असून त्याची वेळोवेळी तपासणी केली जाते, असे सांगितले. त्याच अनुषंगाने आजही त्यांनी मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. एसएसपीच्या म्हणण्यानुसार, अयोध्या धामच्या सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत संपूर्ण शहर लहान-मोठ्या पॉकेट्समध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक पॉकेटची जबाबदारी वरिष्ठ राजपत्रित अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.
ते म्हणाले की, श्री राम मंदिर संकुलात तयार करण्यात आलेल्या सर्व चौकांमध्ये पुरेशा प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांव्यतिरिक्त पीएसी कंपन्यांचाही सहभाग आहे. याशिवाय शहरातील इतर सर्व महत्त्वाच्या आस्थापना आणि संस्थांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यांनी सांगितले की, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून प्रत्येक कोपऱ्यावर लक्ष ठेवले जात आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने रिअल टाईम इनपुट जनरेट होत असून त्या आधारे आवश्यक ती व्यवस्था व तयारी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित ऑडिओ क्लिपची ‘तरुण भारत लाईव्ह’ पुष्टी करत नाही. पण या ऑडिओ क्लिपमुळे बोलणारी व्यक्ती आपलं नाव आमिर असल्याचं सांगतोय. तो राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देतोय. “आमच्या मस्जिदला हटवून तिथं राम मंदिर बनवलं जात आहे. आता मंदिरला बॉम्बने उडवून देऊ. आमचे तीन सहकारी कुर्बान झाले आहेत. आता यावेळी मंदिरला पाडावच लागेल”, असं अतिरेकी ऑडिओ क्लिपमध्ये म्हणताना दिसतोय.
संबंधित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर गुप्तचर यंत्रणांपासून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाले आहेत. राम मंदिरसह काही प्रमुख प्रतिष्ठानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2005 मध्ये रामजन्मभूमीवर दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यामागे जैश ए मौहम्मद याच संघटनेचा हात होता हे नंतर समोर आलं होतं. जैशकडून वारंवार अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.