मोठी बातमी! ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाला नवे वळण

गेल्या काही दिवसांपासून नाशिक ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. रोज या प्रकरणातील नवनवीन माहिती समोर येत आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अरविंद लोहारेला २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर भूषण पाटील आणि अरविंद बलकवडेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज (२२ ऑक्टोबर) पुण्यात या प्रकरणी सुनावणी झाली. याबाबत पुणे पोलिसांनी कोर्टात माहिती दिली आहे.

अरविंद लोहारे हा ललित पाटील सोबत २०२० मध्ये येरवडा कारगृहात ड्रग्सच्या तस्करीमध्ये अटक होता. अरविंद लोहारे हा केमिकल इंजिनीयर होता. त्याला ड्रग्स बनवण्याचा फॉर्म्युला माहित होता. तर रहीम अन्सारीला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. कारण रहीम अन्सारीकडे ड्रग्स तस्करीची मोठी जबाबदारी होती. नाशिक येथून रहीम ड्रग्स राज्यभरात पोचवत असायचा, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
तरी, ड्रग्ज प्रकरणी ललित पाटील याची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी ललित पाटील याच्या नाशिकमधील घराची आणि शिंदेगाव या ठिकाणी असलेल्या कारखान्याच्या जागेवर जाऊन मुंबई पोलिसांनी झाडाझडती घेतली. तसेच संबंधित इतर ठिकाणीसुद्धा चौकशी केली. या प्रकरणातील मोठे खुलासे लवकरच करणार असल्याचे ललित पाटील याने अटक झालेल्या दिवशी म्हटले होते. त्यामुळे तो आता कोणाची नावे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.