मोठी बातमी! वर्ल्ड कपपूर्वीच क्रिकेट विश्व हादरलं; तीन भारतीय निलंबित

जगभरातील क्रिकेटप्रेमी आता मोठ्या स्पर्धेची वाट बघत आहेत. मात्र, त्याआधीच क्रिकेट विश्वात जबरदस्त खळबळ माजली आहे. कारण आयसीसीने एका लीगमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा दावा केला आहे. परिणामी अनेकांवर बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीने एकूण आठ जणांवर अतिशय गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले आहे.

बांगलादेशचा माजी अष्टपैलू खेळाडू नासिर हुसैनसह एकूण 8 जणांच्या नावाचा त्यामध्ये समावेश आहे. यामध्ये क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ आणि टीमच्या मालकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीसीने नासिर हुसेनवर कलम 2.4.3, कलम 2.4.4 आणि कलम 2.4.6 लावण्यात आले आहे. या अंतर्गत आरोप करण्यात आले असून क्रिकेट स्पर्धा खेळताना काही भेटवस्तू मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच याबाबतची माहिती लपवण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

नासिर हुसेनने बांगलादेशकडून 19 कसोटी, 65 एकदिवसीय सामने आणि 31 टी-20 सामने खेळले आहेत. मात्र 2017 पासून त्याने कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळ केला नाही. मात्र तो बांगलादेश प्रीमियर लीग आणि इतर काही लीगमध्ये सक्रिय असल्याचे मात्र सांगण्यात आले आहे. अबुधाबी टी-10 लीगचे दोन टीम मालक कृष्ण कुमार चौधरी आणि पराग संघवी यांच्यावरही गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या दोघांवर ईसीबीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच संघाच्या हिटिंग कोच, टीम मॅनेजर, सहाय्यक प्रशिक्षक आणि इतर दोन देशांतर्गत खेळाडूंवरही याबाबतचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

आयसीसीकडून ज्यांच्या आरोप केले आहेत, त्या सर्वांना निलंबित केले असून त्यांना आता स्पष्टीकरण देण्यासाठी काही दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. जगभरात खेळल्या जाणार्‍या अनेक प्रकारच्या क्रिकेटवर आयसीसीकडून नजर ठेवण्यात येते. तर आयसीसीच्या ईसीबीकडूनही वेळोवेळी खेळाडू आणि क्रिकेट मंडळांच्या सहकार्याने वेगवेगळ्या प्रकारची चौकशी करत असते आणि त्यातूनच हे सर्व उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे.