मोठी बातमी; शरद पवारांचा जळगाव, धुळे जिल्ह्यांचा दौरा रद्द

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात भुकंप झाला होता. दरम्यान यानंतर अजित पवार विरूद्ध शरद पवार असा सामना रंगला आहे. यादरम्यान पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी शरद पवारांनी राज्याच्या दौर्‍याची घोषणा केली होती. दरम्यान या दौर्‍यात शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलेले असतानाच पवारांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. यामुळे शरद पवारांचा जळगाव व धुळे जिल्ह्याचा दौरा देखील रद्द झाला आहे.

राष्ट्रवादीमध्ये होत असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर शरद पवारांच्या या दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात होता मात्र पावसाचा अंदाज घेता हा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला आहे. पावसाळी वातावरणामुळे धुळे आणि जळगाव येथील दौरे रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र शरद पवार उद्याची येवल्याची सभा घेणार आहे. या सभेनंतर उर्वरित दौरे पवार आठ दिवसांनी करणार आहेत.

पावसाळी वातावरणामुळे पवारांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. उद्या येवल्यातील सभेनंतर पवार धुळे आणि जळगाव दौर्‍यावर जाणार होते. मात्र ते येवल्याहून मुंबईला परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आठ दिवसांनंतर ते धुळे आणि जळगाव दौर्‍यावर निघणार आहेत. शरद पवारांचा आज नाशिकमध्ये मुक्काम आहे. शरद पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधण्याची घोषणा केली असून त्यांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात होणार आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना उद्याच्या सभेत पवार काय उत्तर देणार?, भुजबळ आणि अजित पवारांचा कसा समाचार घेणार हे उद्या स्पष्ट होईल.