राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आज शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
कार्यकारी मंडळाचे सदस्य असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीकडे सामान्यांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. तर या बैठकीला इतर नेतेही उपस्थित असणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार आहेत. दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली होत असते. पुण्यातील मांजरी याठिकाणी ही बैठक पार पडणार आहे. अजित पवार या बैठकाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जयंत पाटील आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाची चर्चा आहे.