नंदुरबार : सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाला भगदाड पडल्याची घटना १७ रोजी घडली. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी तात्काळ पुल वाहतुकींसाठी बंद करण्याचे आदेश दिल्याने वाहने इतर मार्गाने वळविण्यात आले. मात्र काल १८ रोजी पुन्हा पुलाचा मोठा भाग कोसळला. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सारंगखेडा पुलावरून एक मोठे अवजड वाहन जात असताना वाहनाचा टायर खड्ड्यात रुतल्याने पुलाला मोठे भगदाड पडले. १७ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने वाहनाला १६ चाके असल्यामुळे वाहन तिथून निघाले. ग्रामस्थांच्याच्या लक्षात ही गोष्ट येताच पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन कळविले.
टाकरखेडा येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक थांबवली. सारंगखेडा व टाकरखेड्याचा दिशेने पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी व मोटरसायकल स्वारांसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून बरेजच्या छोट्या पुलावरून तात्पुरती वाहतूक सुरू केली.
दोंडाईचा अनरदबारी हा रस्ता बंद करण्यात आला असून गुजरातकडून धुळयाकडे जाणारी वाहने अक्कलकुवा कुकरमुंडा-नंदुरबार धुळे, गुजरातकडून धुळयाकडे जाणारी वाहने अक्कलकुवा तळोदा नंदुरबार धुळे, गुजरातकडून धुळयाकडे जाणारी वाहने अक्कलकुवा तळोदा प्रकाशा-नंदुरबार- धुळे, गुजरातकडून जळगांवकडे जाणारी वाहने अक्कलकुवा तळोदा शहादा -शिरपूर जळगांव वाहतूक वळविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी सांगितले.