मोदींच्या तिसऱ्या इनिंगमध्ये भारत होणार जगातील तिसरी अर्थव्यवस्था

जळगाव : भाजपच्या कारकिर्दीत भारताची अर्थव्यवस्था दहा वर्षांत अकराव्या क्रमांकांवरून पाचव्या स्थानांवर आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या तिसऱ्या इनिंगमध्ये भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होणार असून ही मोदींची तिसऱ्या टर्मची गॅरटी असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. जळगाव येथील सागर पार्कवर आयोजित भाजपाच्या युवा संवाद कार्यक्रमात मंगळवारी 5 रोजी ते बोलत होते.

युवा संवाद कार्यक्रमात व्यासपीठावर केंद्रीय मंत्री भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री विजयकुमार गावित, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री विजय चौधरी, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार हिना गावित, आमदार सुरेश भोळे, आमदार जयकुमार रावल, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, डॉ.केतकी पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, शहराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम आदी उपस्थित होते.

काँग्रेसवर टीका करतांना अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला 50 वर्षांचा हिशेब द्यावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून युवक-युवतींचा सन्मानच केला आहे. काश्मिरमध्ये 370 कलम हटविण्यास काँग्रेसकडून विरोध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रक्ताच्या नद्या वाहतील म्हणून सांगण्यात आले. कुणी दगड मारण्याचीही हिंमत केली नाही.
पाकीस्तानात घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. भारताला दहशतवाद्यापासून मुक्त केले. 70 वर्षांपासून रामलल्ला टेंटमध्ये विराजमान होते. अयोध्येत रामलल्लाची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याचप्रमाणे काशी विश्वनाथ कॉरिडॉर साकारण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात युवांच्या आत्मशक्तीचा सन्मान करण्यात आला. लोकसभा निवडणूकीत मतदान करतांना युवकांना बायोडाटा बघण्याचा अधिकार आहे. युवा मतदार भारताला महान बनविण्यासाठी मतदान करणार आहे. तरूणांनी आत्मनिर्भर, विकसित भारतासाठी भाजपाला लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याची साद गृहमंत्री अमित शहा यांनी तरुणांना घातली. देशातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरीव कार्य केले. 80 कोटी लोकांना अन्नधान्य योजनेचा लाभ देण्यात आला असून 12 कोटी लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर, 14 कोटी घरामध्ये हर घर जल, घर घर जलच्या माध्यमातून पाणी पोहचविण्यात आले. 4 कोटीहून अधिक नागरिकांना घरे बांधून देण्यात आली. 200 कोटी नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्याचप्रमाणे देशात उद्योग व्यवसायात वाढ होऊन रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी 24 लाख कोटींचे मुद्रा लोन देण्यात आले. 11 कोटी शेतकऱ्यांना सन्मान निधीचा लाभ देण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारताची समृध्दीकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.