नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली. यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे, काय माहिती. कोरोनाची लस मोदींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का? संशोधक गवत उपटत होते का? असे सगळे अंधभक्त आणि त्यांचे गुरू म्हणल्यानंतर यांना कोणते व्हॅक्सिन द्यायचे ते ठरवावे लागेल. यांना व्हॅक्सिन देण्याची गरज आहे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला होता.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. अडीच वर्ष जो व्यक्ती आपल्या कार्यकर्त्यांना भेटला नाही. घरातच स्वतःला बंद करून बसले. कोरोनाच्या भयाने घरातून बाहेर पडले नाही. त्यांना सत्तेतून घालवण्याचे काम जनतेन केले. बाळासाहेब ठाकरे ज्या विचारधारेचा विरोध करत त्यांच्यासोबत गेले. हा दिवस तर येणारच होता. आता पश्चाताप करून काय उपयोग, असा टोला अनुराग ठाकूर यांनी लगावला.
कोरोना काळात फक्त देशच नाही तर सगळे जग मान्य करते की, जगभरातील १६० देशांना भारताने औषधे पुरवली. भारतात २२० कोटी मोफत लस देण्याचे काम मोदी सरकारने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून फंड देण्यात आला. वैज्ञानिकांना प्रेरित करण्यात आले तेव्हाच लस तयार झाली. प्रत्येक घरात जाऊन लस देण्याचे काम मोदी सरकारने केले. तुम्ही त्यावेळी घाबरून खोलीत बंद होतात. तुम्ही तर मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला विसरून गेला होतात, अशी खोचक टीका अनुराग ठाकूर यांनी केली.