नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्राला एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी मिळाली. या नव्या 174 किमी रेल्वे मार्गासाठी तब्बल 7 हजार 105 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या मार्गामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा अजिंठा लेण्यांच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेमार्गासह 8 मोठ्या प्रकल्पांना मंजूरी दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यावेळी 24 हजार 657 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आल्याचे ते म्हणाले. यामध्ये जालना ते जळगाव नवीन रेल्वेमार्गासाठी 7 हजार 105 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
त्यापैकी केंद्र सरकार 50% आणि महाराष्ट्र राज्य सरकार खर्चाच्या 50% खर्च उचलणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केंद्र आणि राज्य असा संयुक्त विद्यमाने साकारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्रासह मध्ये प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाबसह दिल्ली आणि कोलकाता या महानगरांच्या मार्गाशी जोडले जाणार आहे.
कोणाला होणार फायदा?
मराठवाड्यामध्ये जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखली जाणारी अजिंठा लेणी आहे. तसेच तीर्थक्षेत्र असलेले राजूर गणपती हे प्रसिद्ध ठिकाण आहे. मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येता. या नव्या रेल्वे मार्गामुळे ही ठिकाणे जोडली जाणार आहेत. जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्ग झाल्यास याचा फायदा मराठवाडा आणि खान्देश भागातील स्थानिकांना उद्योजकांना आणि विशेषत: शेतकऱ्यांना होणार आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प जालना-राजूर-सिल्लोड-अजिंठा-जळगाव असा आहे.