तरुण भारत लाईव्ह । ९ सप्टेंबर २०२३। मोरक्को मधून एक भयानक घटना समोर येतेय. मोरक्कोमध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप शुक्रवारी झाला. या भूकंपात आतापर्यंत २९६ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो घरे कोसळली आहेत. तर १५३ नागरीक जखमी झाले आहेत. जखमींना उपचार सुरु आहेत.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराकेश शहरापासून ७१ किमी दक्षिण-पश्चिमेस १८.५ किमी खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजेच्या सुमारास येथे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान शहराबाहेरील जुन्या भागाचे झाले आहे. सध्या बचावकार्य हे वेगाने सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यूएस स्टेट जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, गेल्या १२० वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप आहे. या भूकंपाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये लोक धावताना दिसत आहेत. “मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या घटनेत ज्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी भारत तत्पर आहे”, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.