मोरगावात हायप्रोफाईल जुगारावर छापा : 16 जुगार्‍यांसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरून लोकप्रतिनिधींमध्ये आरोपांचा कलगीतुरा रंगला असतानाच रावेर तालुक्यातील मोरगाव येथे राजरोसपणे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेने सोमवारी पहाटे छापेमारी करीत 16 जुगारींच्या मुसक्या बांधल्या. एक लाख 46 हजार 940 रुपयांच्या रोकडसह आठ चारचाकी वाहने, सहा दुचाकींसह 55 लाख 46 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने जुगारींच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस अधीक्षकांच्या माहितीवरून कारवाई
जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मोरगाव येथील जुगार अड्ड्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. मोरगाव, ता.रावेर येथील सदगुरु बैठक हॉलच्या बाजुस प्रल्हाद पुंडलिक पाटील (मोरगाव) यांच्या घराच्या कुंपणाच्या आत प्रल्हाद पाटील हा इतर लोकांसह झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर सोमवारी पहाटे साडेचार वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी 16 जुगार्‍यांना पकडण्यात यंत्रणेला यश आले तर अन्य संशयित अंधाराचा सामना घेत पसार होण्यात यशस्वी झाले.

यांनी केली कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देवढे, रवी पंढरीनाथ नरवाडे, युनूस शेख इब्राहिम, कमलाकर भालचंद्र बागुल, महेश आत्माराम महाजन, संतोष रामस्वामी मायकल, किरण मोहन धनगर, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, भारत शांताराम पाटील, प्रमोद शिवाजी ठाकूर यांच्यासह रावेरचे निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब नवले, समाधान कौतीक ठाकुर, विशाल शिवाजी पाटील, प्रमोद सुभाष पाटील, सचिन रघुनाथ घुगे आदींनी कारवाईत सहभाग नोंदवला.

या संशयीतांविरोधात दाखल झाला गुन्हा
जुगार अड्डा मालक संदीप दिनकरराव देशमुख (48, पूर्णाड), संजय दर्शन गुप्ता (50, लालबाग, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश), शांताराम जीवराम मंगळकर (47, लालबाग, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश), समाधान काशीनाथ कोळी (30, रा.सांगवा, ता.रावेर), कासम महेबूब तडवी (28, रा.पिंप्री, ता.रावेर), जितेंद्र सुभाष पाटील (35, रा.विवरा, ता.रावेर), कैलास नारायण भोई (23, रा.भोईवाडा, रावेर), मनोज दत्तु पाटील (48, रा.पिंप्रीनांदू, ता.मुक्ताईनगर), मनोज अनाराम सोळंखे (34, रा.आलमगंज, बर्‍हाणपूर), सुधीर गोपालदास तुलसानी (47, इंद्रनगर, बर्‍हाणपूर), रवींद्र काशीनाथ महाजन (54, रा.वाघोदा, ता.रावेर), बापू मका ठेलारी (31, रा.पूर्णाड, ता.मुक्ताईनगर) राजु सुकदेव काळे (54, रा.प्रतापपूरा, बर्‍हाणपूर), युवराज चिंधु ठाकरे (65, रा. महालक्ष्मी मंदिरा जवळ रावेर, सोपान एकनाथ महाजन (59, रा.डापोरा अडगाव, ता.बर्‍हाणपूर), छोट्या (पूर्ण नाव माहित नाही), जागा मालक प्रल्हाद पुंडलिक पाटील (मोरगाव, ता.रावेर) व अन्य दोतीन-तीन संशयीतांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जुगार अड्डा मालक संदीप दिनकरराव देशमुख (48) हे यापूर्वी पूर्णाड येथे जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.